Search This Blog

Saturday, August 27, 2016

राम राम मित्र मैत्रिणींनो !

Get Together Once More च्या संपर्क कक्षेने कळस अध्याय गाठला गेलाय. ( काही माझ्या सारखे अपवाद सोडून ) सगळे हिरीरीने त्यात भाग घेतात. नमस्कार, गुड मॉर्निंग , रोजच्या गप्पा, खेचाखेची मस्तच चालू असते. 

शाळेतील अनंत आठवणी ! त्यांना उजाळा देणे हे तसे कठीणच . परंतु काही गोष्टी या नेहमीच्या लक्षात राहण्यासारख्याच. त्यातील १ म्हणजे आपली भीमाशंकर येथे गेलेली शाळेची एकमेव सहल. पहाटे ४ वाजता शाळेत येऊन  S T महामंडळाच्या लाल डब्ब्याने आपण गेलो होतो. बरोबर ठोंबरे सर असल्याने, कुठलाही वाव नसल्याने, चौकोनी चेहरा करून च सगळे बसले होते. बस निघाली . थोडं अंतर गेल्यावर सहजच भाल्या ( योगेश भालेराव ) ने Torch चालू करून बसच्या खिडकीतून बाहेर फोकस मारला आणि सर्वजण मोठ्याने हसायला लागले. मी ही बाहेर डोकावलो आणि हसायला लागलो. बाहेर रस्त्याच्या कडेला सकाळी घराबाहेर जाणारी टमरेल गेंग बसली होती आणि भाल्या त्यांच्यावर फोकस मारायचा. हा प्रकार चालू असतांना पानसरे सर तिथे आले आणि होणारा प्रकार पाहून त्यांनाही हसू आवरेना ! 

हळू हळू गाण्यांची मैफल रंगली. मग पुढे बसलेले आणि मागे बसलेले असे दोन ग्रुप झाले. गाणी चालू असतांना मध्येच गोडळकर सर आले आणि बस मध्ये एकदम पिन ड्रॉप सायलेन्स ! सगळ्यांना वाटले आता फटके पडतील. हळूच सरांनी शर्ट च्या दोन्ही बाह्या वर सारून टाळ्या वाजवायला सुरुवात केली आणि " रात भर जाम से जाम टकरायेगा " गाणे म्हणणे चालू केले. मग नंतर जो धिंगाणा झाला जो वेगळा सांगायलाच नको !

भीमाशंकर येथे पोहोचल्यावर सर्वांचे जेवणाचे डबे उघडले गेले. सर्वांच्या डब्यात एकच भाजी आणि ती ही बटाट्याची . सगळे जण एकमेकांच्या डब्यात डोकावत होते आणि हसत होते. केवळ माझ्या डब्यात भेंडीची भाजी होती. मग काय सगळ्यांनी यथेच्छ ताव मारला. 

संध्याकाळी परतीच्या प्रवासात पाऊस सुरु झाला आणि कुठेतरी पुलावरून पाणी वाहत असल्याने नगर ला येण्याचा मार्ग बदलावा लागला. त्यात बराच वेळ गेला. पण मिळणाऱ्या वेळेचा सदुपयोग गोडळकर सर, जगदाळे सर, पानसरे सर यांनी चांगला करू दिला. त्यामुळे अगदी आठवणीत राहावी अशीच ती सहल झाली.  

अशा आणखीही काही आठवणी आहेत. पण पुढच्या वेळी .